अमळनेर (प्रतिनिधी)– घरकाम महिला कामगारांना शासनाच्या सोयी सुविधेपासून वंचित रहावे लागत असल्या बाबतच प्रश्न नागपूर अधिवेशनात आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी उपस्थित केला केल्यानंतर कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी घरेलू कामगारांना जनश्री विमा योजना व मृत कामगारांच्या वारसास अंत्यविधी सहाय्य पोटी २ हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा लाभ मिळणार असल्याचे सांंगितले.

राज्यातील घरकाम महिला कामगारांची संख्या असंख्य असून त्यांना शासनाच्या सोयी सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे. घरेलू कामगारांना पेन्शन योजना व इतर कल्याणकारी योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे का? यासंदर्भात आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी नागपूर अधिवेशनात प्रश्न लावून धरला, याप्रश्नावर उत्तर देतांना कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने घरकाम करणार्‍या कामगारांकरीता १२ ऑगस्ट २०११ च्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. यामंडळामार्फत जनश्री विमा योजना व अंत्यविधी सहाय्य २ हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येत आहे. अन्य योजनांचा लाभ देण्याबाबत प्रस्ताव विचाराधीन आहे,असेही सांगितले.