‘महाऑनलाईन’कडून डाटा ऑपरेटरांची अवहेलना

* राकेश कोल्हे *
जळगाव– जिल्ह्यातील १५ तालुक्यात एक हजारावर ग्राम पंचायतीत कार्यरत असलेल्या डाटा ऑपरेटर्सना अनेक महिन्यापासून मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. ‘महाऑनलाईन’च्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या या यंत्रणेकडून डाटा ऑपरेटरांची अवहेलना करण्यात येत असून त्यांच्या वेतनात दिसणार्‍या विसंगतीमुळे ठेकेदाराच्या पदरात बर्‍याच मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ पडत असल्याची जोरदार चर्चा आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये डाटा ऑपरेटर म्हणून महाऑनलाईनकडून अनेक युवकांना प्रारंभी नियुक्त करण्यात आले मात्र, या नियुक्तीला जवळपास एक वर्ष पूर्ण होत असूनदेखील त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारचे नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या ३ हजार ५०० रुपये तर पदवीधरांना ३ हजार ८०० रुपये मानधन देण्याचे कबुल करण्यात आले होते मात्र आजपर्यंत ऑपरेटरांच्या मानधनासंदर्भातील कोणताही ताळमेळ जमलेला नाही. त्यांना कोणत्या व किती महिन्याचे मानधन दिले गेले? याचा साधा तपशिलही दिला जात नाही व याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, अशी ओरड होत आहे.
तेराव्या वित्त आयोगातून प्रत्येक डाटा ऑपरेटरपोटी दरमहा ८ हजार १६ रुपये ‘महाऑनलाईन’कडे वर्ग केले जात असल्याचे वृत्त असून प्रत्यक्षात डाटा ऑपरेटरांना कधी दरमहा ३२०० रुपये, कधी २००० तर कधी ४००० असे मानधन दिले जात आहे. गेल्या चार महिन्यांपासून तर मानधन न मिळाल्यामुळे डाटा ऑपरेटरांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात काही तालुक्यातील डाटा ऑपरेटरांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. काही तालुक्यातून धनादेशाद्वारे मानधन देण्यात आले मात्र धनादेशाच्या रकमांमध्ये तफावत असल्याने काही डाटा ऑपरेटरांनी हे धनादेश नाकारल्याचे वृत्त आहे.
यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने ‘महाऑनलाईन’चे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत चालसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन या गंभीर प्रश्‍नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ‘‘बरेच ऑपरेटर गैरहजर असतात व हजर असलेले ऑपरेटर काम करत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मानधन रकमेत तफावत होऊ शकते. डाटा ऑपरेटरांना बँक अकाऊन्ट नंबर मागितला होता मात्र बर्‍याच ऑपरेटरांनी अद्याप तो दिलेला नाही. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या आहेत, अशा ठिकाणी संबंधित ग्रा.पं.ची कामे पं.स.मध्ये केली जात आहे. डाटा ऑपरेटरांच्या हजेरीनुसार धनादेश काढण्यात आले आहे मात्र ज्या ऑपरेटरांचे मानधन बाकी असेल ते लवकरच देण्यात येईल.’’ यासंदर्भात काही तक्रारी असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. एकंदरीत ग्रा.पं. डाटा ऑपरेटरांच्या नेमणुका, त्यांना मिळणारे अल्प मानधन व ‘महाऑनलाईन’कडे वर्ग केले जाणारे वेतन यात फार मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची जोरदार चर्चा असून जि.प.च्या वरिष्ठ पदाधिकारी व अधिकार्‍यांनी याप्रश्‍नी लक्ष देऊन ग्रा.पं.डाटा ऑपरेटरांना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

One thought on “‘महाऑनलाईन’कडून डाटा ऑपरेटरांची अवहेलना”

  1. जर आवाज उटवयाचा असेल तर कम्पनीचा टेका रदद करा व कंपनी जे पैशे भरता ग्रामपंचायत १३ वित्त आयोगा तून जो सगणकला लागणारा खर्च असेल तो ऑपरेटर बगेल पण त्याच्या खात्यावर ८००० रुपये मानधन जमा व्हायला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *