‘महाऑनलाईन’चा घोळ करोडोंमध्ये !

* राकेश कोल्हे *
जळगाव– ग्रामपंचायतीच्या संगणीकरणाच्या नावाखाली ‘महाऑनलाईन’ ही कंपनी मोठ्या प्रमाणात घोळ करत असून हा आकडा करोडोंमध्ये असल्याचे वृत्त आहे.

याबाबत वृत्तांत असा की, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये संगणीकरणाचे कंत्राट महाऑनलाईन या कंपनीला देण्यात आले आहे. डाटा ऑपरेटर म्हणून महाऑनलाईनकडून अनेक युवकांना प्रारंभी कंत्राटी पध्दतीने नियुक्त करण्यात आले आहे. मात्र त्यांना अद्याप योग्य मानधन देण्यात आलेले नाही. या अन्यायाला ‘साईमत’ने वृत्तमालिकेद्वारे वाचा फोडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे सखोल अध्ययन केले असता यात कोट्यवधींची हेराफेरी होत असल्याचे दिसून येत आहे. ‘महाऑनलाईन’ला जिल्ह्यातील ११५१ ग्रामपंचायतींच्या संगणकीकरण करण्याचे काम देण्यात आले आहे. संबंधीत कंपनीने या कामाचे कार्यान्वयन करण्यासाठी फक्त ८०० ऑपरेटरांची भरती केली आहे. मात्र असे असूनही संगणकीकरणाचा बोजवारा उडाला आहे. कारण ११५१ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ७०० ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँडचे कनेक्शनच नाही. यामुळे येथे ऑनलाईन सुविधेचा जराही लाभ होत नाही.
इकडे या बोजवारा उडालेल्या सुविधेसाठी संबंधीत ग्रामपंचायतीने प्रतिमहा ८०१६ (आठ हजार सोळा) रूपये ‘महाऑनलाईन’ला द्यावे असा पाच वर्षांचा करार करण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला वर्षाला ९६ हजार रूपये संबंधीत कंपनीला द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचे वार्षिक ‘बजेट’ हे एक लाख रूपयांच्या आत आहे. मात्र असे असूनही त्यांना ‘त्या’ कंपनीकडे ९६ हजार रूपये वार्षिक इतकी रक्कम भरावी लागत आहे. तेराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला ७० टक्के रक्कम विकास कामांसाठी खर्च करण्याची तरतूद आहे. परिणामी या ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी निधी खर्च करण्याऐवजी तो ‘महाऑनलाईन’कडे वर्ग करावा लागत आहे. एवढे होऊनही बहुतांश गावांमध्ये या सुविधेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. या सर्व बाबींचा विचार करता, न दिलेल्या सुविधेपोटी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कोट्यवधी रूपयांचा फटका पडत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *