स्थायी समिती सभापतीपदी नितीन लढ्ढा

nitin laddha
जळगाव (प्रतिनिधी)– मनपाच्या स्थायी समिती सभापती पदावर खान्देश विकास आघाडीचे नितीन लढ्ढा यांची निवड करण्यात आली. त्यांनी महानगरविकास आघाडीचे जेष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील यांचा दोन मतांनी पराभव केला. महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी ज्योती इंगळे यांची निवड करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रतिभा कापसे यांनी खाविआच्या पारड्यात मत टाकल्याने चर्चेला उधाण आले आहे.

आज सकाळी पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी ज्ञानेश्‍वर राजूरकर यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभापती अध्यक्ष व महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या प्रसंगी प्रभारी आयुक्त साजिद पठाण, नगरसचिव गोपाल ओझा, महापौर राखीताई सोनवणे, उपमहापौर डॉ.सुनिल महाजन, नगरसेवक रमेशदादा जैन यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. मनपाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी खान्देश विकास आघाडीतर्फे नितीन लढ्ढा यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता तर भाजपा व मनसेने नगरसेवक नरेंद्र पाटील यांना पाठींबा दिला होता. या पाठींब्यामुळे स्थायी समिती पदासाठीची निवड चुरशीची होणार किंवा नाही याकडे लक्ष लागून होते.

आज सकाळी स्थायी समितीचे सभासद संदेश भोईटे, अमर जैन, चेतन शिरसाळे, अभय पाटील, रमेशदादा जैन, सदाशिव ढेकळे, इकबालउद्दीन पिरजादे यांनी नितीन लढ्ढा यांच्या पारड्यात तर सुनिल माळी, रविंद्र पाटील, लिना पवार, मिलींद सपकाळे, संतोष पाटील यांनी नरेंद्र पाटील यांना मते दिली. मात्र त्यांचा दोन मतांनी नरेंद्र पाटील यांचा पराभव झाला. जिल्हाधिकार्‍यांनी सर्व १५ सभासदांना हात उंचावून मतदान करण्याच्या सुचना केल्या नंतर सभासदांनी आपआपल्या पसंतीच्या उमेदवारांना हात उंचावून मतदान केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थायी समितीची दोघा सभासदांनी पक्षादेश मानून या निवडणूक प्रक्रियेत तटस्थ भुमिका घेतल्यामुळे आधीपासूनच ही निवडणूक एकतर्फी मानण्यात येत होती. या निवडीनंतर खाविआच्या समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात नितीन लढ्ढा यांचा सत्कार करुन एकच जल्लोष केला.

आणि जिल्हाधिकारी विसरले…!
आज सकाळी स्थायी समिती सभापती निवडीसाठी महानगरपालिकेत आलेले जिल्हाधिकारी ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी ११.१० वाजता मनपा सभागृहात प्रवेश करणारे उपायुक्त जगताप यांना ‘तुम्हा कोण? इथे का आले? काय काम तुमचं?’ अशा प्रश्‍नांची सरबत्ती सुरु केली. जगताप यांनी आपण उपायुक्त असून निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आल्याचे सांगुनही जिल्हाधिकारी राजूरकर यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. मनपा आयुक्त कापडणीस सुटीवर असल्याकारणामुळे प्रभारी आयुक्त म्हणून उपजिल्हाधिकारी साजिद पठाण हे काम पाहत आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी उपायुक्त जगताप हे तेथे उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांना चक्क उपायुक्तांचा विसर पडल्याने सभागृहात हशा पिकून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत होते.
महिला-बालकल्याण समिती सभापतीपदी इंगळे
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी खान्देश विकास आघाडीच्या ज्योती इंगळे आणि मनसेच्या पद्माबाई सोनवणे यांच्यात लढत झाली. यात इंगळे यांना ज्योती तायडे, ममता कोल्हे, शीतल चौधरी, त्यांचे स्वत:चे तसेच राष्ट्रवादीच्या प्रतिभा कापसे यांची मते मिळाली. पद्माबाई सोनवणे यांना स्वत:च्या मतासह मंगला चौधरी, भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे आणि ज्योती चव्हाण यांची मते मिळाली. राष्ट्रवादीच्या प्रतिभा कापसे हा तटस्थ राहिल्या असत्या तर ईश्‍वरचिठ्ठीने सभापतीपदाची निवड होणार होती. यात हे पद मनसेला मिळण्याचीही शक्यता होती. यामुळे पडद्याआड खान्देश विकास आघाडी आणि राष्ट्रवादीने तडजोड करून प्रतिभा कापसे यांना खाविआ उमेदवाराच्या पारड्यात मत टाकण्याचे निर्देश दिल्याचे आतल्या गोटातील वृत्त आहे. दरम्यान, या माध्यमातून खान्देश विकास आघाडी आणि राष्ट्रवादी पुन्हा एक पाऊल एकमेकांच्या जवळ आल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *