जळगाव (प्रतिनिधी)- मराठीतील ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘खाऊचा गाव’ या धम्माल बालगीतांच्या अल्बमचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे, अभिनेत्री एश्‍वर्या नारकर आणि ज्येष्ठ कवी व संगीतकार यशवंत देव यांच्याहस्ते मुंबई येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात झाले.
कवीवर्य यशवंत देव, प्रविण दवणे, राजा मिसर आणि प्रिया सफले यांच्या बालविश्‍वातील धमाल गाण्यांना झी सारेगम लिटल चॅम्पस् फेम आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन तसेच अबोल कानडे यांनी गायिले आहे. युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप या जगातील सर्वात मोठ्या म्युझिक कंपनीने बनविलेल्या अल्बमच्या सोहळ्याप्रसंगी जळगावच्या कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला. तसेच स्वरमयी देशमुख, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन आणि अबोल कानडे यांनी अल्बमच्या गाण्यांसह अनेक बालगीते सादर केली. नृत्याविष्कारात सिद्धी सफळे, चैताली भिरुड, शिवानी चौधरी, शिवानी पाटील, भूमिका पाटील, श्रिया वडोदकर, गौतमी आठवले, कल्याणी मिसर, स्वरमयी देशमुख, शुभम भिरुड, सिद्धांत साळुंखे आणि अबोल कानडे सहभागी होते. ठेका धरायला लावणारी आणि मोठ्यांनाही पुन्हा बालपण अनुभवयास देणारी अशा मुग्धगीतांना यशवंतदेवांचा संगीत स्पर्श झाल्याने ही गीते अवीट ठरतील अशी प्रतिक्रिया अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
अल्बमच्या निवेदनाचे लेखन जळगावच्या प्रिया सफळे यांनी तर निवेदन सादरीकरण सिद्धी सफळे हिने केले आहे. कार्यक्रमाचे निवेदन झी टीव्हीचे प्रख्यात निवेदक रत्नाकर तारदाळकर यांनी केले. ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री अंजली घांग्रेकर, संगीत संयोजक अरविंद हसबनीस, युनिव्हर्सल ग्रुपचे मराठी विभाग प्रमुख राजन प्रभू तसेच कवयित्री प्रिया सफळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रदीप सफळे, मिलींद देशमुख आदींचे सहकार्य लाभले. नृत्यास मार्गदर्शन अर्पणा भट, नरेश बागडे, श्रिया वडोदकर आणि प्रिया सफळे यांनी केले.

‘खाऊचा गाव’ या अल्बमचे प्रकाशन करतांना संगीतकार यशवंत देव व अभिनेत्री सुलभा देशपांडे सोबत ऐश्‍वर्या नारकर, अंजली घांग्रेकर आदी.