आम आदमीची कार्यकारिणी जाहीर

चाळीसगाव(प्रतिनिधी)- येथे आम आदमी पार्टीची सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली. सभेत कार्यकारिणी जाहीर करून प्रकाशित करण्यात आली.

या जाहिर कार्यकारिणीत प्रा.गौतम निकम (जिल्हा प्रतिनिधी), प्रा. तुषार निकम (तालुका सचिव), डॉ. अजय पाटील (तालुका समन्वयक), विजय शर्मा (तालुका संयोजक), विनोद शर्मा (तालुका कोषाध्यक्ष), सुकदेव पाटील (तालुका सह.संयोजक), अँड.अविनाश जाधव (कायदेविषय सल्लागार), अँड. वाडीलाल चव्हाण (कायदेविषय सल्लागार), डॉ.सचिन निकुंभ, देवेंद्र पाटील, योगेश्वर राठोड, विजय चौधरी, जावेद सय्यद, नासिर शेख, भागवत पाटील (कार्यकारिणी सदस्य) यांचा समावेश करण्यात आला आहे.

अभिनेते नंदू माधव आज जळगावात

जळगाव-प्रसिद्ध चित्रपट कलावंत व आम आदमी पक्षाचे बीड येथील उमेदवार नंदू माधव हे आज आपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगावात येत आहेत.

डॉ.संग्राम पाटील यांच्या प्रचारासाठी अभिनेते नंदू माधव हे जळगावात येत आहेत. दिवसभर प्रचार करण्यासोबत नंदू माधव यांची दुपारी ३.३0 वाजता गोलाणी मार्केट येथे जाहीर सभा होणार आहे. यावेळी प्रा.शेखर सोनाळकर उपस्थित राहणार आहेत. डॉ.संग्राम पाटील यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची टीम जळगावात दाखल झालेली आहे. यात यवतमाळ येथून महेर पवार, आंबेजोगाई येथील हनुमंत चाटे, गोदिंया येथून देवेंद्र गणवीर यांचा समावेश आहे. संग्राम पाटील यांचा विविध चौकात पथनाट्य, गाणी यांच्या माध्यमातून हे कार्यकर्ते प्रचार करीत आहेत.

जळगावमधुन ‘आप’चे डॉ.संग्राम पाटील

जळगाव(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदार संघातून आम आदमी पक्षाच्या राज्यस्तरीय समितीने एरंडोलचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.सग्राम पाटील यांच्या नावावर उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अगदी १०० टक्के मलाच उमेदवारीची खात्री आहे अशा शब्दात स्वत: डॉ.संग्राम पाटील यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, रावेर लोकसभा मतदार संघातून लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नावालाही राज्यस्तरीय समितीने मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. आज दुपारपर्यंत आम आदमी पक्षाच्या राज्यस्तरीय समितीचा अधिकृत निरोप प्रतिभा शिंदे यांच्यापर्यंत पोहोचलेला नव्हता त्यामुळे त्यांचे निकटवर्तीयसुध्दा यासंदर्भात जास्त बोलण्यास नकार देत होते. मात्र पुढच्या दोन दिवसात ही दोन्ही नावे अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता खात्रीलायक सुत्रांनी व्यक्त केली.

आम आदमी पक्षाच्या या जळगाव जिल्ह्यातील दोनही उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगाव sangram patil शहरात आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जाहीर सभेच्या आयोजनाचे नियोजन स्थानीक पदाधिकारी करीत आहेत. अरविंद केजरीवाल यांची जळगावला जाहीर सभा व्हावी आणि भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, चाळीसगाव अशा मोठ्या शहरांमध्ये शक्य होईल त्याप्रमाणे कार्यकर्त्यांसोबत किमान दोन ठिकाणी तरी केजरीवाल यांच्या बैठका व्हाव्यात या दृष्टीने जिल्ह्यातील कार्यकर्ते तयारी करीत आहेत. आम आदमी पक्षाचे डॉ.संग्राम पाटील व प्रतिभा शिंदे हे दोनही उमेदवार निवडणुकीच्या खर्चासाठी लोकवर्गणीतून निधी उभा करणार आहेत. त्यामुळे प्रस्थापीत राजकीय पक्षांच्या धनशक्ती अथवा दाडंगाईची काळजी करण्याची आमच्या कार्यकर्त्यांना गरज नाही असेही यावेळी डॉ.संग्रमा पाटील म्हणाले.

‘आप’ला आधार पक्षाच्या वलयाचा

* शेखर पाटील *
जळगाव
– स्थापन झाल्यापासून अवघ्या एक वर्षातaap देशव्यापी प्रसिध्दी मिळवणार्‍या आम आदमी पक्षातर्फे स्थानिक पातळीवर निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात ‘आप’च्या लोकप्रियतेच्या बळावर मातब्बर राजकारण्यांना धक्का देण्याचा दावा करण्यात आला आहे. राजकारणातील सर्व शक्यता लक्षात घेता ‘आप’ चमत्कार करणार का? भलेही विजय न मिळाल्यास किमान या पक्षाचा कुणाला फटका बसेल? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

भारताच्या राजकीय इतिहासात आम आदमी पक्षाच्या देशात एखाद्या धुमकेतूसमान झालेल्या उदयाला कुणी विसरू शकणार नाही. ढोबळ मानाने राजकारणाची बाराखडीदेखील न समजणार्‍या आणि विविध क्षेत्रातील सर्वसामान्यांना एकत्र करत भ्रष्टाचारविरोधी लढाईच्या माध्यमातून राजकारणात दमदार एंट्री करत अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सर्वांना चकीत केले आहे. खरं तर डिसेंबर २०१२ मध्ये स्थापन झालेला हा पक्ष खर्‍या अर्थाने दिल्ली विधानसभेतील अनपेक्षित यशानंतर झोतात आला. यानंतर देशभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यात प्रवेश करण्याचा सपाटा लावला. यातील पहिल्या टप्प्यात मुळचे जळगाव जिल्ह्यातील तसेच राज्यातील बहुचर्चित जलसंपदा खात्यातील घोटाळा चव्हाट्यावर आणणारे विजय पांढरे यांचाही समावेश होता. यथावकाश तालुकाच नव्हे तर अगदी गाव पातळीवरही ‘आप’बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्ष नोंदणीसही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे.

प्रारंभी विजय पांढरे यांना जळगाव जिल्ह्यातून मैदानात उतरवण्याचे संकेत होते. मात्र पांढरे यांनी नाशिकमधून राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते छगनराव भुजबळ यांच्याविरूध्द दंड थोपटले आहे. यानंतर जळगावसाठी मनपातील सत्ताधार्‍यांविरूध्द कित्येक वर्षांपासून लढाई करणारे ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्रअण्णा पाटील यांचे नाव आले. मात्र हे नावही मागे पडले आहे. आता एरंडोल येथील डॉ. बाबा आमटे रूग्णालयाचे डॉ. संग्राम पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनीदेखील जोरात तयारी सुरू केली आहे. इकडे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी प्रारंभी जळगाव येथील प्रथितयश अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रताप जाधव यांचे नाव समोर आले. यानंतर लोकसंघर्ष मोर्चाच्या झुंजार नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र ऐनवेळी काहीही बदल झाला नाही तर डॉ. संग्राम पाटील आणि डॉ. प्रताप जाधव हे अनुक्रमे जळगाव आणि रावेरातून ‘आप’चे उमेदवार राहू शकतात. एका अर्थाने दोन्ही मतदारसंघात कोरी पाटी व स्वच्छ प्रतिमा असणार्‍या उमेदवारांना तिकिट मिळणार आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना-भाजप महायुती व मनसेसारख्या पक्षांपेक्षा ‘आप’ची स्थिती भिन्न आहे. बहुतांश राजकीय पुर्वानुभव नसणार्‍यांचा या पक्षात समावेश आहे. सद्यस्थितीत शिवसेनेच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा जयश्री न्याती आणि भुसावळचे माजी नगराध्यक्ष गोकुळ कारडा यांचा अपवाद वगळता ‘आप’ मध्ये बहुतेक अराजकीय व विशेष सर्वसामान्य व्यक्तींचा समावेश आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीला सामोरे जातांना अनेक कसरतींना सामोरे जावे लागते. यात अगदी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणे, मतदान प्रक्रियेत सहभागी होणार्‍या ‘पोलिंग एजंट’ पासून ते विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आदींचा समावेश आहे. यामुळे दोन्ही उमेदवार हे ‘आप’ची जनकल्याणकारी विचारधारा आणि अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेच्या बळावर प्रचार करणार असले तरी स्थानिक पातळीवर लागणारे मनुष्यबळ उभे करण्याचे खरे आव्हान ‘आप’च्या उमेदवारांसमोर राहणार आहे.

या संदर्भात ‘आप’च्या एका मान्यवराने व्यक्त केलेले मत हे विचारात घेण्यासारखे आहे. ते म्हणाले की, साधारणत: २० वर्षांपुर्वी राजकारणात संक्रमणाचा एक काळ आला होता. तेव्हाची तरूणाई हिरीरीने शिवसेना-भाजपच्या प्रचारासाठी पुढे येत होती. या सर्वसामान्य जनतेच्याच जीवावर हे दोन्ही पक्ष उदयास आले. सध्या मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जनतेला कोणताही फरक दिसून येत नाही. अनेक विरोधी उमेदवार करत असलेला खर्च हा डोळे दिपवणारा असतो. यामुळे अगदी दिल्लीसह गल्लीतील सत्ताधारी आणि विरोधक हे ‘एकाच माळेचे मणी’ असल्याची भावना जनतेची झाली आहे. यामुळे आजच्या संक्रमण काळातील राजकीय पोकळी ‘आप’ भरून काढणार आहे. यासाठी आमच्याकडे आधीच उत्स्फुर्तपणे सदस्य नोंदणीसाठी झुंबड उडालेली आहे. यात तरूणांसह समाजाच्या सर्व स्तरांमधील व सर्व वयोगटातील स्त्री-पुरूषांचा समावेश आहे. यामुळे ‘पोलिंग एजंट’च नव्हे तर प्रचारासाठीही आम्हाला भाडोत्री माणसे वा पक्ष कार्यकर्त्यांवर खर्च करण्याची आवश्यकता नाही.

या मान्यवराने व्यक्त केलेले मत काही अंशी अतिआत्मविश्‍वासपुर्ण वाटू शकते. मात्र या निवडणुकीत ‘आप’च्या उमेदवारीची प्रस्थापितांना धास्ती बसू शकते. प्रारंभी हा पक्ष भाजपची मते खाणार असल्याचा अंदाज होता. मात्र दिल्लीत भाजप आणि कॉंग्रेसला समान पध्दतीने ‘आप’ने धक्का दिल्याचे दिसून आले होते. यामुळे कोण कुणाची मते खातो हे आजच सांगता येणार नाही. यामुळे ‘आप’तर्फे करण्यात आलेला विजयाचा दावा आज अवास्तव वाटत असला तरी या पक्षाचे उमेदवार दोन्ही मतदारसंघामध्ये उलटफेर करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

‘आप’ महाराष्ट्रातही सर्व जागा लढविणार

* विकास पाटील *
जळगाव (प्रतिनिधी)– स्वच्छ व प्रामाणिक शासन आणि प्रशासनाची हमी जनतेला देणे, याच मुद्यावर आम्ही आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा लढविणार आहोत, असे सांगत आम आदमी पक्षाचे नेते विजय पांढरे यांनी राज्यातही प्रस्थापित पक्षांना खुले आव्हान देण्यास त्यांचा पक्ष तयार असल्याचे सूतोवाच आज केले. आम आदमी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीपासून दिल्ली विधानसभा निवडणुकीतील Vijay_Pandhareयशापर्यंत अरविंद केजरीवाल यांची रणनिती आणि त्यांनी घेतलेली मेहनत महाराष्ट्रातही विजय पांढरे व त्यांच्या साथीदारांनी घेतली तर निश्‍चितच चित्र बदलेल, असा होरा राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विजय पांढरे यांनी ‘साईमत’शी बोलतांना केलेले हे सूतोवाच महत्वाचे ठरते.
चार राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या कालच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात आपापल्या परीने तर्कवितर्क लावत जो तो ज्याचे त्याचे आडाखे बांधतो आहे. या सगळ्या चर्चांमध्ये दिल्लीतील कॉंग्रेसला घायकुतीला आणत फारशी राजकीय पार्श्‍वभूमी नसलेल्या परंतु पारदर्शक भ्रष्टाचारमुक्त शासनाची हमी देणारे उमेदवारांवर मतदारांनी बर्‍यापैकी विश्‍वास टाकल्यामुळे ‘आम आदमी पक्ष’ अग्रस्थानी आहे. यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ‘आप’च्या संभाव्य प्रभावाविषयी चर्चा सुरू झाली आहे. प्रदीर्घ काळाच्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले आणि सिंचन खात्यातील गैरव्यवहारांची जंत्री थेट मुख्यमंत्र्यापुढे मांडतांना सेवेत असतांनाच राजकीय दबाव झुगारून ठाम भूमिका घेणारे विजय पांढरे आता आम आदमी पक्षात सहभागी झाले आहेत. केजरीवाल यांच्यासारखीच भ्रष्टाचाराविरोधी चीड, भ्रष्टाचार मुक्तीसाठी थेट राजकीय पर्याय उभा करून प्रस्थापितांना नामोहरम करण्याची भूमिका आणि केजरीवाल यांच्यासारखाच सरकारी सेवेत असतांना राजकीय मगु्ररीचा जवळून घेतलेला अनुभव, ही केजरीवाल आणि पांढरे यांच्यातील साम्यस्थळे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अन्य राजकीय नेते आतापासूनच स्वाभाविकपणे दक्ष राहणार आहेत; हा कालपासून सुरू झालेल्या चर्चेतला एक पदर आहे.
या संदर्भात ‘साईमत’शी बोलतांना विजय पांढरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील निवडणुकांसाठीही आमचे नियोजन दिल्लीसाठी होते तसेच आहे. अर्थात केजरीवाल आणि मी तयारीला लागलो आहोत. आमचा पक्ष सत्तेवर आला तर आयएएस व आयपीएस अधिकारी सुध्दा प्रामाणिक असतील तरच आमच्या दृष्टीने महत्वाचे असतील. प्रशासनातील आमुलाग्र बदल आणि अत्यंत पारदर्शक लेाकाभिमुख कारभार; हे मुद्दे आमचे महाराष्ट्रातील निवडणुकांमध्येही असतीलच. राज्यकारभारात भ्रष्ट वृत्तीचे प्राबल्य वाढल्याचे सगळीकडे दिसते. म्हणजे शासन स्तरावरच भ्रष्टाचाराची बीजे आहेत. राजकीय सत्तेची मुजोरी दाखवत भ्रष्टाचार बिनबोभाट केला जातो. त्यामुळे विधानसभा असो की लोकसभा; सरकारी यंत्रणांमधूनच ही भ्रष्ट वृत्ती कायमची घालवली पाहिजे. हाच आम आदमी पक्षाचा महत्वाचा अजेंडा आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भूमिका सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याची असली तरी काही महत्वाच्या मुद्यांवर त्यांचीही भूमिका आम्हाला अनुकूल असल्याने मनापासून त्यांच्या सदिच्छा आमच्यासाठीच असतील, असेही यावेळी विजय पांढरे यांनी आवर्जुन नमूद केले.